Saturday, June 13, 2020

a page from lock down diary

दैनंदिनी तले एक पान 
कुठ तरी नवीन रस्त्यांनी प्रवासाला निघालेले असावं आणि एखादा छान सा  घाट लागावा रस्त्यात . खोल दरीमधून पाण्याचा आवाज ही येत असतो . . कधी गाडी आपण थांबवितो . कधी ठरवितो पुढच्या वेळेस नक्की थांबुया इथे.  थांबलो तरी लगेच आठविते  अमुक वेळेला पोचायचं आहे रे.
 पण कधी कधी कामाचं विचार चक्र येवढं व्यस्त ठेवत की  घाट आधी गाडीला जाणवतो आणि म्हणून नंतर आपणास .  एका सुंदर अनुभवाला आपण बगल देऊन गेलोय हे आपणास कळत सुद्धा नाही .
 अगदी सकाळी चालायला जायचं उदाहरण घ्या . अगदी शहरात सुद्धा निसर्गाचे आविष्कार पुसटसे जाणवतात .
नवीनच आलेला एखादा पक्षी,  पावसाळ्यात  फुललेलं गवतफुल , आचानक पिवळ्या फुलांनी डवरलेली कडेची झाडं  दिसतात. पण  ऑफिस पकडायच असतं थांबून आस्वाद नाही घेता येत .
         आता या महामारी च्या भीती मुळे आयुष्य थोडंसं थबकलय. ठरवून ही घेता नसता आला असा निवांतपणा मिळालाय.  आताशा  आजूबाजूला असणाऱ्या पण माहित नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी दिसतायत. माझ्या सोसायटीच्या आवारात शेवग्यायच झाड आहे मला मागच्या आठवड्यात कळलं. आणि काल मागच्या रिकाम्या जागे मध्ये दोन भली मोठी आंब्याची झाड ही दिसली.  आज  भिंतीलगत  पाच मिनिट उभा राहून  अंदाज घेत होतो कैऱ्या कशा काढता येतील. पण  झाडावरून पडण्याच्या भितीपेक्षा शेजारी काय म्हणतील या विचारांनी तिथून निघालो .  पण लहानपणी आख्खा आंब्याचा  मौसम  झाडावर  चढून कैऱ्या चोरण्यात जायचा याची आठवण मात्र मनाला सुखावून गेली .  आमच्या सोसायटीत फक्त एक पांढर कबुतर आहे . कधीतरी फेऱ्या मारताना मला ते विशिष्ट ठिकाणीच दिसत. त्यांची पण हद्द ठरली असावी बहुधा. नाहीतरी सगळी कबुतर सारखीच दिसतात .. हे पांढर होत म्हणून लक्ष्यात राहिलं. आज लक्ष्यात राहिलेली अजून एक गोष्ट म्हणजे आडवा गेलेला भाला मोठा साप. 15 फूट तरी असावा. धामण असावी बहुधा नाहीतर अजगर. थांबून तो  दगडात दिसेनासा होईपर्यंत पाहिलं .किती सुंदर असतो साप. भीती वाटते खरी  पण म्हणून त्याचं  साैंदर्य  न्याहाळयाच आणि वाखाणण्याच  राहून जात.
     माझ्या  घराजवळ  एका मोकळ्या जागेत रोज एक दानशूर माणूस रोज कबुतरांना भरपूर धान्य टाकून जातो.   कबुतरांचा थवाच्या थवा तिथे येऊन  दाने टिपतो . पण चाहूल लागली की सगळेच्या सगळे उडून जातात.  पिसांचा नुसता सडा पडतो . पंखाच्या फडफडीचा  एकत्रित येणारा आवाज बऱ्याच दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटात वापरलाय . मला ते पक्षी उडताना बघून नेहमी परिंदा आठवितो नाना पाटेकर चा.  फेऱ्या घेताना मी जरा लांबून जातो. त्यांच्या  खाण्यात व्यत्यय नको असतो पण त्या बारीक  पिसा पासून ही दूर राहायचं असतं .
 आज ही असाच एक मोठा थवा बसलेला पाहिलं मी.
 एक कुत्रा धावत  थव्यामध्ये शिरला .पक्षांशी  खेळतोय अस वाटल मला सुरुवातीला. भुर्रकन सगळे पक्षी उडून गेले आणि कुत्रा मात्र तोंडामध्ये एक कबुतर घेऊन परत आला.  अच्छा ही शिकार होती तर . आता त्या ठिकानाकडे माझे लक्ष लागून राहिलं.  सगळी कबुतर इमारतीवर झाडावर बसून होती . खूप वेळ फिरकली नाहीत . कुत्रा ही तिथे  थोड्या अंतरावर बसून होता.  थोड्या वेळानी पुन्हा कबुतर खाली उतरली. दाणे टिपायला लागली. कुत्रा बसूनच होता.  पण कुणीतरी जवळून गेलं आणि पक्षी  पंखाचा मोठा आवाज करीत उडाली.  दोनदा तीनदा असे झाल्यावर  कुत्र्यान पुन्हा एकदा शिकार केली . मला वाटलं त्यांची स्मरणशक्ती थोडी कमी असावी .
 दुसरं असं जाणवल की   चाहूल लागली की बाहेरच्या बाजूचे पक्षी लवकर उडून जातात , नंतर  त्यांच्या बाजूचे . शेवटच्या पक्ष्यांना माहीत पडेपर्यंत काही क्षण निघून जातात. ते तिथेच गोंधळून उभे असतात. आणि शेवटी उडून जातात. त्यामुळे कुत्रे घुसले की त्यांना शिकार नक्की मिळते .
 एक गमतीदार विचार मनात येऊन गेला . आपला तो दानशूर माणूस खाऊ घालतो ते  कबुतरां साठी की कुत्र्यांना शिकार मिळावी म्हणून?

No comments:

Post a Comment